कर्नाटकातील हापूसचे कोकणात ‘पॅकींग’   

संजय ऐलवाड 
 
पुणे : कोकणातील बहुतांश आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना कराराने बागा दिल्या आहेत. कमी उत्पादनामुळे बागा घेणार्‍या व्यापार्‍यांनी नवा फंडा शोधून काढला आहे. कर्नाटक हापूस चक्क कोकणात आणून तेथे पेट्या भरल्या जात असून त्याच पेट्या कोकणातील हापूस म्हणून बाजारात पाठविल्या जात आहेत. त्यातील बराचसा माल पुणे आणि मुंबई बाजारपेठेत पाठविला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
हापूसचा व्यापार करणारे व्यापारी कोकणातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांशी विशिष्ट रक्कमेला करार करून घेतात. मात्र, यंदा हवामानाचा मोठा फटका कोकणातील आंब्याच्या बागांना बसला आहे. यंदा कमी फळधारणा झाली असून आंब्यांचे उत्पादन घटल्याने व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी व्यापारी चक्क कर्नाटकातील हापूस खरेदी करून कोकणात आणत आहेत. तेथे हापूस पेट्यांमध्ये भरून त्यावर कोकणच्या ब्रॅन्ड असलेले स्टिकर लावले जात आहेत. याच पेट्या पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठेत पाठविल्या जात आहेत. दरवर्षी रस्त्यावर कोकणच्या हापूसच्या नावाने कर्नाटकचा हापूस ग्राहकांना विकला जातो. 
 
उष्णतेमुळे मोहोर गळती 
 
यंदा कोकणात ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस सुरू होता. त्यानंतर अपेक्षित थंडीही पडली नाही. त्यामुळे झाडांना मोहोर आला नाही. त्यानंतर उष्णतेत अचानक वाढ झाली. त्यामुळे लागलेला मोहोर गळून पडला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हापूसच्या उत्पादनात लक्षणीय घट होणार असून बाजारात आवक कमी असणार आहे. त्यामुळे दरही अधिक असणार असल्याचे हापूस विक्रेत्यांनी सांगितले. 
 
यंदा किरकोळ विक्रेत्यांसह मोठे व्यापारी हंगामाच्या प्रारंभीपासून ग्राहकांची फसवणूक करण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे हापूसची खरेदी करताना ग्राहकांना जागरूक राहावे लागणार आहे. अन्यथा ग्राहकांची हमखास फसवणूक होणार आहे. हंगाम नुकताच सुरू झाला असल्याने फसवणुकीचे प्रमाण कमी आहे. मात्र, बाजारात जशी आवक वाढेल, त्याच प्रमाणात कोकणचा म्हणून कर्नाटकाचा हापूस विकण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात हापूसच्या डझनाचा दर ८०० ते १२०० रूपये होता. यंदा १५०० ते २००० रूपये दर आहे. शिवाय, यंदाच्या हंगामात कोकणच्या हापूसचा दर अधिकच असणार आहे. उत्पादन घटल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २५ ते ३० टक्के अधिक दर असणार आहेत, असा अंदाज शेतकरी व व्यापारी वर्तवीत आहेत. आंबा तपासण्याची यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे दरवर्षी कोकणचा हापूस म्हणून कर्नाटकचा हापूस विकण्याचे प्रमाण वाढले आहे. 
 
कोकणचा हापूस कसा ओळखावा
 
कोकणातील हापूसची साल पातळ तर कर्नाटकातील हापूसची साल जाड असते. कोकणातील हापूस आतून भगवा असतो; तर कर्नाटकातील हापूस आतून पांढरट, पपई सारखा असतो. कोकणातील हापूसचा सुगंध येतो; कर्नाटकातील हापूसचा फार सुगंध येत नाही. कोकणच्या हापूसची चव गोड असते. कर्नाटक हापूस गोडीला थोडासा कमी असतो. कर्नाटक हापूस बर्‍याच वेळा आकाराने मोठा असतो.

Related Articles